Planning should be done to make the All India Official Language Council a success
अखिल भारतीय राजभाषा परिषद यशस्वी करण्यासाठी नियोजन करावे-विभागीय आयुक्त सौरभ राव
देशभरातून मान्यवर तसेच जवळपास सात हजारपेक्षा अधिक अधिकारी उपस्थित राहणार
पुणे : हिंदी राजभाषा दिवस-२०२३ आणि अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे आयोजन करण्याचा बहुमान जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाद्वारे योग्य नियोजन करुन परिषद यशस्वी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज दिले.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय राजभाषा विभागाच्यावतीने १४ आणि १५ सप्टेंबर २०२३ रोजी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुल येथे आयोजित करण्यात येत असलेल्या संयुक्त परिषदेच्या आयोजनासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस भारत सरकारच्या राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली आर्या, संयुक्त सचिव मीनाक्षी जौली, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, क्रिडा आयुक्त सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, उपायुक्त श्रीमती वर्षा लड्डा-उंटवाल, अपर पोलीस आयुक्त अरविंद चावरीया,बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे, आयआरसीटीसीचे महाप्रबंधक पिनाकिन मोरावाला यावेळी उपस्थित होते.
या सोहळ्यासाठी देशभरातून मान्यवर तसेच जवळपास सात हजारपेक्षा अधिक अधिकारी उपस्थित राहणार असल्याने, कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, विद्युत पुरवठा, पिण्याचे पाणी, महत्वाच्या व्यक्तींसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्तीसंबधी कार्यवाही त्वरित करावी. इतर व्यवस्थेसंदर्भात सर्व संबधित यंत्रणांनी योग्य नियोजन करावे अशी सूचना श्री.राव यांनी यावेळी केली. बालेवाडी येथील क्रिडा संकुलात हस्तकला प्रदर्शन, वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी करावी असेही श्री.राव यांनी सांगितले.
राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली आर्या यांनी अखिल भारतीय पातळीवरील या परिषदेचे आयोजन करण्याची संधी पुण्याला मिळाली असल्याचे सांगितले. परिषदेचे आयोजन यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासनाला केले. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com